नवी दिल्ली : आसाममध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ होती. ती यावेळी नाही, असे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी रविवारी म्हटले. भारतीय जनता पक्ष माझ्याकडे बोट दाखवून आणि मुस्लिमांना शत्रूच्या ठिकाणी दाखवून हिंदूंची मते एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून अजमल म्हणाले, या प्रयत्नांत त्याला यश येणार नाही. (There is no Modi wave in Assam this time - Badruddin Ajmal)
एआययूडीएफवर जातिवाद केला जात असलेला आरोप निराधार असल्याचे सांगून अजमल यांनी आसाममध्ये माझ्या या पक्षापेक्षा कोणतीही संघटना जास्त धर्मनिरपेक्ष नाही, असा दावा केला. गेल्या निवडणुकीत एआयडीयूएफने मुस्लिमेंतरांना लक्षणीय असे प्रतिनिधित्व दिल्याचा उल्लेख त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला.बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “आसाममध्ये भाजपचा पराभव होईल आणि त्यामुळे देशासाठी आसाममधील निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. हे घडण्यासाठी महाआघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे. या महाआघाडीत आम्ही आणि काँग्रेस आहोत.” पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरीत भाजपचा पराभव होईल. यातून संपूर्ण देशात संदेश जाईल, असे सांगून अजमल यांनी ‘धर्मनिरपेक्ष शक्ती’ विजयी होतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. एआययूडीएफ धर्मनिरपेक्ष असून तसाच राहील; परंतु भाजप हा स्वत:च जातीय असून तो जातीय राजकारण करतो व याच चष्म्यातून तो सगळ्यांकडे बघतो, असेही ते म्हणाले.