नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ७५० शेतकरी मरण पावले. त्याबद्दल केंद्र सरकारने शोकही व्यक्त केला नाही, अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली.
ते म्हणाले, आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे इतके मृत्यू होऊनही केंद्र सरकारने साधी त्याची दखलही घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत. शेतकरी हे जणू या देशाचा भाग नाहीत असेच ते मानत असावेत. शेतकरी आपले आंदोलन यापुढेही सुरूच ठेवणार आहेत.
किमान हमी भावाबाबत जोवर केंद्र सरकार संसदेत कायदा संमत करीत नाही व तीन नवे कृषी कायदे रद्द करीत नाही, तोवर शेतकरी आपले आंदोलन सुरू ठेवणार आहेत. या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा आहे हे सरकारने विसरू नये. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून देशात विविध ठिकाणी आंदोलन करीत आहेत.