नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही ही चांगली घटना असली, तरी या शहरात एकही ग्रीन झोन नाही ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. जिथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून येत नाही, त्या विभागाला ग्रीन झोन म्हणतात.दिल्लीच्या अख्यत्यारीत येणाऱ्या ११ जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे सध्या रेड झोन, तर २ जिल्हे आॅरेंज झोनमध्ये आहेत. कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेले विभाग रेड झोनमध्ये; तसेच ही साथ मध्यम प्रमाणात पसरलेले विभाग आॅरेंज झोनमध्ये येतात. कोरोनाच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे साथीचा फैलाव होण्यास मदत होत आहे,असे दिल्ली सरकारने केंद्राला कळविले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचे तीन हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील रेड झोनपैकी काही विभाग आॅरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले, काही झोनचे आकारमान कमी करण्यात आले, तर या साथीशी मुकाबला करणे अधिक सोपे जाईल असा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू होता. ती प्रक्रिया सुरू झाल्याने दिल्लीतील झोनच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे असे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सांगितले. दिल्लीतील साथीचा प्रादुर्भाव झालेल्या विभागांची संख्या मंगळवारी १०० वर पोहोचली. कोरोना साथीचे संपूर्ण निर्मूलन करण्याठी नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, जिथे या साथीचा प्रादुर्भाव दिसेल तेवढ्याच भागापुरता झोन जाहीर करण्यात यावा. झोन आकाराने छोटे असल्यास अधिक कार्यक्षमेतेने उपाययोजना करता येतात.दिल्लीतील जहांगीरपुरीसारख्या छोट्या झोनमध्ये लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. मोठा झोन असला तर प्रत्येक गल्लीबोळाकडे बारीक लक्ष ठेवणे शक्य होत नाही. जनतेने सोशल डिस्टन्सिंग पाळावे, महत्त्वाचे कारण असले तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे अशा सूचना दिल्ली सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत. पण काही ठिकाणी हे निर्बंध लोक धुडकावून लावत आहेत.
दिल्लीत तीन दिवसांत कोरोनाचा नवा रुग्ण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 4:03 AM