पांडू (झारखंड) : अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीच्या मार्गात जगातील कोणतीही शक्ती अडथळा आणू शकणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी म्हटले. ते बिश्रामपूर विधानसभा मतदारसंघातील पांडू येथे प्रचारसभेत बोलत होते.राजनाथसिंह म्हणाले, फ्रान्सकडून घेतलेली राफेल लढावू विमाने सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या छावण्या नष्ट करण्यास सक्षम आहेत. ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या जात असताना सिंह म्हणाले की, राममंदिराच्या निर्माणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केलेला आहे. काश्मीरशी संबंधित अनुच्छेद ३७० रद्द करण्याबद्दल ते म्हणाले, १९५२ मध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (भारतीय जन संघाचे संस्थापक) म्हणाले होते की, एका देशात दोन घटना, दोन पंतप्रधान आणि दोन ध्वज असू शकत नाहीत. आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण केले असून, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासनही पूर्ण केले आहे.झारखंडमध्ये गेल्या दोन दिवसांत माओवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करून राजनाथसिंह म्हणाले की, या हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना भाजपची सरकारे (केंद्र आणि राज्यात) चोख प्रत्युत्तर देईल.झारखंडमध्ये दोन घटना घडल्याचे मी पाहिल्या आहेत. केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार कोणालाही बंदूक हाती घेऊ देणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असावे.लक्ष वळविण्याचा भाजपचा प्रयत्ननवी दिल्ली : झारखंडमध्ये विरोधी पक्ष स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवत असताना सत्ताधारी भाजप सरकार आपल्या अपयशापासून मतदारांचे लक्ष दूर करण्यासाठी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर ओरावोन यांनी केला.झारखंडमध्ये प्रचारसभेत बोलताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राममंदिराचा प्रश्न सुटू नये म्हणून काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात अडथळे आणले, असा आरोप तीन दिवसांपूर्वी केल्यानंतर ओरावोन यांनी वरील आरोप केला.
राममंदिराच्या उभारणीत कोणताही अडथळा नाही - राजनाथसिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 6:01 AM