ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - शहरात दररोज ४७ रुपयांपेक्षा व गावात ३२ रुपयांपेक्षा जास्त खर्च करणारी व्यक्ती गरीब म्हणून गणली जाणार नाही, अशी गरिबीची नवी व्याख्या आरबीआयचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांच्या समितीने तयार केली आहे. यापूर्वी सुरेश तेंडुलकर यांच्या समितीने शहरात ३३ रुपये व गाम्रीण परिसरात २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नसल्याचे म्हटले होते.
रंगराजन समितीने देशातील गरिबीविषयी तयार केलेला अहवाल नुकताच केंद्रीय नियोजन मंत्री राव इंद्रजितसिंह यांच्याकडे सोपवला. या अहवालात नमूद केल्यानुसार देशातील प्रत्येक दहा व्यक्तींपैकी तीन नागरिक गरीब आहेत. २००९-१० साली ३८.२ टक्के जनता गरीब होती, २०११-१२ साली ही टक्केवारी २९.५ इतकी झाली. शहरात राहणारी व्यक्ती रोज ४७ रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकत असेल तर ती व्यक्ती गरीब असू शकत नाही. तर ग्रामीण भागत राहणारी व्यक्ती रोज ३२ रुपयांपेक्षा जास्त खर्च करत असेल तर त्याला गरीब म्हणून गृहित धरण्यात येणार नाही, असे अहवालात म्हटले आहे.
समितीच्या अहवालानुसार, एका महिन्यात १,४०७ रुपयांपेक्षा कमी खर्च करणा-या व्यक्तीला गरीब मानता येईल, तर तेंडुलकर समितीने ही रक्कम महिना १ हजार रुपये इतकी धरली होती.