ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल हा हिंदू मंदिर असल्याचा कोणताही पुरावा सरकारला मिळाला नाही, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सोमवारी लोकसभेत दिली. याप्रकरणी आग्रा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून ताजमहल हिंदू मंदिर घोषित करून हिंदूना त्यात पूजा करण्याची परवानगी देण्याची मागणी त्या याचिकेत करण्यात आली होती.
या याचिकेची लोकसभेत माहिती देताना, ताजमहल हिंदू मंदिर होते, याबद्दल कोणचाही पुरावा मिळाला नसल्याचे शर्मा म्हणाले. तसेच या विवादामुळे ताजमहलला भेट देणा-यांच्या संख्येवर व पर्यटन व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.