नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. काँग्रेस खासदार सतत गदारोळ घालत असल्याने राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांचा संताप अनावर झालेला पहायला मिळाला. 'ही अत्यंत चुकीची पद्दत आहे. कोणीही माफी मागणार नाहीये. सभागृहात काहीही झालेलं नाही. ते वक्तव्य सभागृहात केलेलं नव्हतं', असं वैंकय्या नायडू म्हणाले आहे.
विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आलं होतं. सुरुवातीला शून्य प्रहर सुरु असताना विरोधक वेलमध्ये उतरले आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर कामकाज स्थगित करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांनी आपला गदारोळ सुरुच ठेवला.
याआधी काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये उतरत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्यी टीकेप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली होती. डॉ मनमोहन सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिका-यांशी चर्चा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या प्रचारसभेत केला होता. तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते. तसेच डॉ मनमोहन सिंग यांनीही भोजन समारंभाबाबत निवेदन प्रसिद्ध करून, मोदी यांचे वक्तव्य खोटे असल्याचे दाखवून दिले होते. मोदी यांनी माफी मागावी, असेही डॉ मनमोहन सिंग म्हणाले होते.
विरोधक गरादोळ घालत असताना वैंकय्या नायडू वारंवार शांत राहण्याची विनंती करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य संसद परिसरात करण्यात आलं नसल्याने माफी मागण्याचा प्रश्न नाही असं वैकय्या नायडू म्हणाले. 'ही संसद आहे. ही राज्यसभा आहे. शून्य प्रहर रद्द करण्याची प्रथा नाहीये. सभगृहाचा अपमान करु नका. चुकीचा संदेश जात आहे', असं त्यांनी सांगितलं.