नवी दिल्ली - नागरिकता विधेयक आणि एनआरसी या संदर्भात देशभरात वादंग सुरू असताना बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचा मित्रपक्ष असलेले जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले. भाजपला घरचा आहेर देताना नितीश यांनी सीएए कायद्यावर चर्चा करणं आवश्यक असल्याचे म्हटले.
सीएए संदर्भात चर्चा आवश्यक आहे. सर्व पक्ष यावर चर्चा करण्यासाठी तयार असतील तर चर्चा व्हायलाच हवी, असं नितीश यांनी बिहार विधानसभेत म्हटले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एनआरसी कायद्याला विरोध केला. तसेच हा कायदा बिहारमध्ये लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. एनआरसीचा मुद्दा केवळ आसाम राज्यापुरता मर्यादीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तसं स्पष्टीकरण दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान नागरिकता कायद्यावरून जदयूमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले होते. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशार यांनी नागरिकता कायद्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी एनआरसीच्या मुद्दावरून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुकही केले होते. तर दुसरीकडे नितीश कुमार हे एनआरसी राज्यात लागू होणार नसल्याचे सांगत होते. आता विधानसभेत पुन्हा त्यांनी एनआरसी लागू न करण्याचा पुनरोच्चार केला आहे.