नवी दिल्ली- सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं विधान अण्णा हजारेंनी केलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून अण्णा उपोषणाला बसले आहे. या उपोषणामुळे अण्णांचं जवळपास पाच किलो वजन घटलं आहे. सरकारकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं अण्णा हजारे नाराज आहेत. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धारही अण्णांनी बोलून दाखवला आहे.आमच्या 11 मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. 11 मागण्यांपैकी कमीत कमी चार मागण्या तरी मान्य करा. तसेच उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला कालावधी निश्चित करून द्या, असंही अण्णा म्हणाले आहेत. अनेक नेते येऊन भेटत असून, आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असंही अण्णांनी स्पष्ट केलं आहे. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
२३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरू केले आहे. दिल्लीत गेल्यावेळी मिळालेला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी दिल्लीचा उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानात अण्णांची प्रकृती जास्तच खालावली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी उपोषणाला गंभीरतेने घेतले आहे. अण्णांनी उपोषणच करु नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांच्या माध्यमातून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला होता. मात्र अण्णांनी दाद दिली नव्हती. आता मात्र उपोषणाचा पाचवा दिवस असताना परिस्थिती चिघळू नये यासाठी पुन्हा एकदा गिरीश महाजनांनाच अण्णांकडे पाठवण्यात आले होते.