वाराणसी- बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) नवनिर्वाचीत चीफ प्रॉक्टर रोयाना सिंह यांनी पदाची सूत्र हाती घेताच महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत निर्णयानंतर आता रोयाना सिंह यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असलेले विद्यार्थ्यांच्या कपडे परिधान करण्यावरचे तसंच मद्यपान करण्यावरचे निर्बंध हटविले आहेत. तर विद्यापीठाच्या मेसमध्ये मांसाहारी पदार्थांवरील निर्बंध हटविण्याचे आदेश दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
रोयाना सिंह या बीएचयूच्या 101 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या महिला चीफ प्रॉक्टर आहेत. 'माझा जन्म युरोपात असून मी जास्त वेळ युरोप आणि कॅनडामध्ये प्रवास करण्यासाठी खर्ची केली आहे. म्हणूनच मुलींच्या कपड्यांवर निर्बंध घालणं म्हणजे स्वतः निर्बंध घालण्यासारखं आहे. तुम्ही तुमचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू करता आणि रात्री साडेदहा वाजता दिवस संपतो. अशावेळी पूर्ण दिवसात जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कपडे वापरायला मिळत नसतील तर ही बाब लाजिरवाणी आहे, असं रोयाना सिंह यांनी म्हंटलं आहे. मुलींनी तोकडे कपडे घातल्यावर मुलं जो शब्द वापरतात त्यावर मला आश्चर्य वाटतं. मुलीजे जे कपडे घातले आहेत त्या कपड्यात जर तिला कम्फर्टेबल वाटत असेल, तर त्यांना का काही हरकत असावी? असंही त्यांनी म्हंटलं आहे. चीफ प्रॉक्टर रोयाना सिंह या विद्यापीठाच्या इन्स्टिट्यट ऑफ मेडिकल सायन्सच्या प्रोफेसरही आहेत. रोयाना या 80 च्या दशकात फ्रान्सच्या रोयनमध्ये नऊ वर्ष राहिल्या आहेत.
दुसरीकडे मद्यपानाच्या मुद्द्यावर रोयाना म्हणाल्या, विद्यापीठातील सगळ्या मुलींचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणूनच या मुलांवर मद्यपानासाठी निर्बंध का घालावेत? असा सवाल त्यांनी विचारला. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या जास्त मुलींकडून जेव्हा शाकाहारी जेवणाची मागणी होते तेव्हाच तिथे शाकाहारी जेवण मिळतं. तसंच काही मुली ठराविक दिवशी मांसाहारी जेवणाची मागणी करतात.
विद्यापीठात शिस्तीचं वातावरण ठेवण्याचं आव्हानगुरूवारी रोयाना सिंह यांनी चीफ प्रॉक्टर पदाची धूरा सांभाळली. विद्यापीठाच्या आवारात अनुशासन टिकवून ठेवण्याचं आमच्या समोर मोठं आव्हान असल्याचं रोयाना सिंह यांनी म्हंटलं होतं. तसंच विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या.