पाटणा : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याने टीकेचे धनी होणारे नितीश कुमार यांनी अखेर मौन सोडले. आपल्याला खुर्चीचा मोह नाही, जो निर्णय घ्यायचा असेल तो एनडीएच्या बैठकीत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ४८ तास उलटल्यानंतर नितीशकुमार गुरुवारी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याचा निर्णय रालोआच्या बैठकीत घेतला जाईल. लोक जनशक्ती पक्षाला रालोआत सहभागी करून घ्यायचे की नाही, हेही त्यावेळी ठरेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी रालोआला १२५ जागांवर विजयी केले. राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावे लागले.
नितीशजी, अंतरात्म्याचे ऐकणार का?
विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे नेते नितीशकुमार आता तरी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सत्तेची खुर्ची सोडतील का’, असा सवाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे. जदप्रणीत महाआघाडीला बहुमतासाठी १२ जागा कमी पडल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाआघाडीची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीसाठी बैठक झाली. तीत एकमुखाने तेजस्वी यांची महाआघाडीच्या विधिमंडळातील नेतेपदी निवड करण्यात आली. निवडणुकीत अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले. फेरमतमोजणीसाठी आम्ही आग्रह धरणार असल्याचेही तेजस्वी म्हणाले.
बिहारच्या जनतेने रालोआला स्पष्ट जनादेश दिला. त्यामुळे सरकार रालोआच स्थापन करेल. मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याचा रालोआच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.- नितीशकुमार
निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तरीही ते मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार आहेत. आता तरी ते अंतरात्म्याचा आवाज ऐकत खुर्चीचा मोह सोडतील का?- तेज्सवी यादव