नवी दिल्ली : ब्राझीलमध्ये ३२४ दशलक्ष डॉलर्सच्या कोव्हॅक्सिन लस मात्रांसाठीच्या कराराने मोठा वाद निर्माण झाला असून हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने त्यात काही चुकीचे असल्याचा ठामपणे इन्कार केला आहे. या करारात अनियमितता झाल्याच्या आरोपांमुळे तो आता निलंबित केला गेला आहे. भारत बायोटेकने निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही कंत्राटांकडे आणि ब्राझीलच्या नियमकांकडून मान्यतेसाठी क्रमाक्रमाने काम करण्याची पद्धत अवलंबिली होती.” ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोव्हॅक्सिन मिळवण्याच्या नेमक्या विषयाबाबत पहिली बैठक नोव्हेंबर २०२० मध्ये झाल्यापासून २९ जूनपर्यंत कंत्राटे आणि नियामकांची मान्यता याबाबत आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रक्रियेत क्रमाक्रमाने काम केले गेले आहे.”
“चार जून रोजी ईयूए प्राप्त झाले. २९ जूनपर्यंत भारत बायोटेकला कोणतेही आगाऊ पैसे (ॲडव्हान्स पेमेंटस) मिळाले नाही की ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाला कोणत्याही लसींचा पुरवठा झालेला नाही. भारत बायोटेकने अशी क्रमाक्रमाने काम करण्याची पद्धत जगात अनेक देशांत कंत्राटांबाबत, नियामकांकडून मान्यतेसाठी आणि पुरवठ्यांसाठी अवलंबिली आहे. ” ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनॅरो हे याप्रकरणी वादात सापडले आहेत. तुलनात्मक जास्त किंमत, वेगाने झालेली बोलणी आणि नियामकांकडून प्रलंबित असलेली मान्यता ही कारणे दाखवून या व्यवहाराची चौकशी ब्राझीलच्या फेडरल प्रॉसिक्युटर्सनी सुरू केली आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारावर स्वाक्षरी झाली.भारत बायोटेकने म्हटले आहे की, ब्राझील आणि इतर देशांत कोव्हॅक्सिन मिळवण्याच्या प्रक्रियेबद्दल प्रसारमाध्यमांत गेल्या काही आठवड्यांपासून येत असलेल्या बातम्या या ‘खोटे चित्र निर्माण करणाऱ्या’ आहेत.—————————-