ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - योगा करताना वेदीक मंत्र म्हणायचे की नाही यावर वाद विवाद झडत असताना, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नीने ओम म्हणण्यात काहीच गैर असल्याचे मत व्यक्त केले आहे. तुम्ही अल्लाह वा गॉड वा रब म्हणत नाही का असा सवाल करत ओम म्हणण्यात काहीच गैर नाही असं सलमा म्हणाल्या. प्रत्येकानं योगा करायला हवा, शिवाय ओमच्या उच्चारानं जास्त ऑक्सिजन मिळतो असंही त्या म्हणाल्या.
योगाला विरोध करणं अत्यंत चुकीचं असल्याचं सांगताना अन्सारी यांनी योगा केलं नसतं तर माझी प्रकृती इतकी चांगली नसती असं म्हटलं आहे. योगाच्या मुखवट्याखाली केंद्र सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप विरोधक करत असल्यामुळे सलमा अन्सारींच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
जून 21 हा योगा दिवस साजरा करण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ओम व वेदीक मंत्रांचे उच्चारण सर्वसाधारण पद्धतींमध्ये नमूद करण्यात आले आहेत. यामुळे हा दिवस व त्याचे साजरा करणं वादग्रस्त ठरले होते.
योगा भाजपाची मालमत्ता नाही
काँग्रेसने भाजपा असंवेदनशील असल्याचा आरोप केला होता. योगा, ही भारताची प्राचीन देणगी असून ती भाजपाची मालमत्ता नाही, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. तर भारतीय समाजावर जातीय अजेंडा लादण्याचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने केला होता.
कोण काय म्हणालं होतं?
- भारताची सेक्युलर डोमोक्रॅटिक वीण नष्ट करण्याचा व हिंदुत्व लादण्याचा प्रयत्न म्हणजे भाजपाचा इंटरनॅशनल योगा डे - सीताराम येचुरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव
- योगा डे म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चाल - शफीक काझमी, इमाम, नाखोडा मशीद, कोलकाता
- देशावर RSS प्रणीत हिंदुत्वाचं सांस्कृतिक राष्ट्रीयत्व लादण्याचा छुपा मार्ग म्हणजे योगा डे - पी. व्ही. मोहन, सदस्य, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी