सुरेश भटेवरा नवी दिल्ली : काश्मीरमधे दगडफेक करणाºयांना आताचे सत्तधारी दहशतवादी म्हणतात. मग गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांना काय म्हणणार? असा रोखठोक सवाल गृहमंत्र्यांना करीत मल्लिकार्जुन खरगे मंगळवारी लोकसभेत गरजले की, काँग्रेसजन अशा भ्याड हल्ल्यांना कधीही घाबरत नाहीत कारण गांधींजीच्या अहिंसेच्या मार्गावर आमचा विश्वास आहे तर भाजपचा अधिक भरवसा घृणा आणि हिंसेवर आहे.खरगेंना उत्तर देताना गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले, राहुल गांधी देशासाठी अनमोल आहेत. दगडफेक कोणावरही असो, अशा घटना निषेधार्हच आहेत. कोणीही त्याचे समर्थन करणार नाही. या प्रकरणात गुजरात सरकारने योग्य कारवाई लगेच केली आहे. तथापि राहुल गांधी ६ वेळा ७२ दिवसांसाठी परदेशात एसपीजी सुरक्षा व्यवस्था नाकारून कशासाठी गेले? गुजरातमधे बुलेटप्रुफ गाडीऐवजी राहुल साध्या गाडीत का बसले? देशाला याचे उत्तर हवे आहे. संसदीय व्यवस्थेने प्रदान केलेली सुरक्षा धुडकावणे हे कायद्याचे उल्लंघन नाही काय? असा प्रतिप्रश्न राजनाथसिंगांनी केला.राहुल गांधींच्या गाडीवरील दगडफेकीवरून मंगळवारी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत काँग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीत तृणमूलचे सदस्यही सहभागी झाले. या गदारोळात लोकसभेचे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.खरगे म्हणाले की, राहुल गांधी पूरग्रस्तांना भेटायला गुजरातमध्ये गेले होते. तिथे २७0 पूरग्रस्त मरण पावले. या दौºयात राहुलच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गाडीच्या मागच्या भागावर जो दगड फेकला गेला तो पुढच्या सीटवर फेकला असता तर राहुल यांच्या जीवाला धोका झाला असता. गांधी कुटुंबातल्या दोन नेत्यांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. देशासाठी शहीद झालेल्या दिवंगत पंतप्रधानांचे राहुल हे पुत्र आहेत.खरगेंच्या भडिमाराला दुजोरा देत तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय म्हणाले की, राहुल गांधींवरील हल्ला अतिशय निषेधार्ह, संसदेची अप्रतिष्ठा करणारा व असहिष्णुतेचे प्रदर्शन घडवणारा आहे. सभागृहाने या घटनेचा एकमताने निषेध करायला हवा आणि भविष्यात राहुलना पुरेशी सुरक्षा व्यवस्था द्यायला हवी.एसपीजी सुरक्षा घेण्याचे टाळणे हे कायदाचे उल्लंघन आहेया घटनेवर गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले की देशातत राहुल गांधींनी १२१ दौरे केले. त्यापैकी १00 वेळा जाणीवपूर्वक त्यांनी एसपीजी सुरक्षा घेण्याचे टाळले. हे कायदाचे उल्लंघन आहे. एसपीजी सुरक्षा व्यवस्था न घेताच ते सहा वेळा परदेशात गेले. या दौऱ्यांमधे राहुल गांधी नेमके काय लपवू इच्छितात, साºया देशाला याची उत्सुकता आहे. अतिविशिष्ठ व्यक्तींना एसपीजी सुरक्षा कायद्याने दिली जाते.सुप्रीम कोर्टाचे याबाबत काही स्पष्ट निर्देश आहेत. गुजरात सरकारने राहुल गांधींना सुरक्षा व्यवस्था देऊ केली होती. मात्र, बुलेटप्रुफ गाडीत न बसता राहुल गांधींनी आपल्या सचिवाच्या सल्ल्यानुसार बुलेटप्रुफ नसलेल्या गाडीत बसणे पसंत केले. पूर्वनियोजित नसलेल्या अनेक ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी ते वारंवार गाडीतून उतरले. काँग्रेसने या दोन्ही घटनांचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.
राहुल गांधींवरील हल्ल्यावरून लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:48 AM