'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 03:16 PM2024-04-11T15:16:13+5:302024-04-11T15:17:03+5:30

अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने रोहन गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी पक्षाला तिकीट परत केले आणि भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

'There used to be frequent insults', congress leader Rohan Gupta joins BJP | 'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश

'तिथे वारंवार अपमान व्हायचा', लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांचा भाजपात प्रवेश

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणी थांबायचे नाव घेत नाहीयेत. गेल्या काही काळापासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याच नेत्यांमध्ये रोहन गुप्ता यांचीही भर पडली आहे. रोहन यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर अपमान केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, रोहन यांना काँग्रेस अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण, त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने रोहन गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण, त्यांनी पक्षाला तिकीट परत केले आणि भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर रोहन म्हणाले, 'मी माझ्या स्वाभिमानासाठी काँग्रेस सोडली. तिथे माझा रोज अपमान व्हायचा. मी स्वतः भाजपच्या वॉशिंग मशीनवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. माझे चारित्र्य पूर्णपणे स्वच्छ आहे. सनातनचा अपमान करणाऱ्यांसोबत काम करता येणार नाही. ज्यांच्या नावातच राम आहे, ते रामाच्या बाजूने आणि सनातनच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगायचे, असा आरोप त्यांनी केला.

 

देशासाठी काम करण्याची भावना
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहन गुप्ता म्हणाले, आज मला भाजपमध्ये प्रवेश करताना अभिमान वाटतो. देशासाठी काहीतरी करण्याची भावना घेऊन भाजपात आलो आहे. राष्ट्र उभारणीसाठी मी मनापासून काम करेन. माझे वडील 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते, मी 15 वर्षांपासून काँग्रेसमध्ये होतो. लालसेपोटी कोणीही पक्ष सोडत नाही. स्वाभिमानाचा विचार केला तर निर्णय घ्यावा लागतो.

कोण आहे रोहन गुप्ता?
काँग्रेसने गुजरातच्या अहमदाबाद उत्तर मतदारसंघातून रोहन गुप्ता यांना तिकीट दिले होते. पण त्यांनी तिकीट परत केले. रोहन यांनी 18 मार्च रोजीच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. निवडणूक लढवू नये, अशी वडिलांची इच्छा असल्याचे कारण त्यांनी त्यावेळेस दिले. यानंतर 22 मार्च रोजी त्यांनी काँग्रेसच्या संपर्क विभागाशी संबंधित एका नेत्यावर सतत अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. रोहन गुप्ता काँग्रेसचे आयटी सेल आणि सोशल मीडियाचा प्रमुख होते. तसेच, ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेही राहिले आहेत.
 

Web Title: 'There used to be frequent insults', congress leader Rohan Gupta joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.