Rahul Gandhi attack PM Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी(27 जानेवारी) मध्य प्रदेशातील महू येथे जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी संविधानाविषयी बोलतांना भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यघटना रद्द करण्याची भाषा वापरली होती. आम्हाला 400 जागा मिळाल्या तर संविधान बदलू, असे ते म्हणाले होते. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते समोर उभे राहिले. त्याचा परिणाम असा झाला की, नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानापुढे झुकावे लागले,' अशी टीका राहुल गांधींनी केली.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी पुढे म्हणतात, 'भारतात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एका बाजूला संविधानावर विश्वास ठेवणारी आणि त्यासाठी लढणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला आरएसएस-भाजप आहे, जी संविधानाच्या विरोधात आहेत, ती विचारधारा संविधान कमकुवत करू इच्छिते. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, त्यात भारताची हजारो वर्षे जुनी विचारसरणी आहे. त्यात आंबेडकर, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचा आवाज आहे. काही दिवसांपूर्वी मोहन भागवत म्हणाले होते की, भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ते खोटे स्वातंत्र्य होते. हा थेट संविधानावर हल्ला आहे.'
कोट्यधीशांना सर्व कंत्राटे दिली
'देशात दलित, आदिवासी आणि मागासलेल्यांसाठी काहीही उरणार नाही. सगळी कंत्राटं दोन-तीन अब्जाधीशांना दिली जातात. भारतातील सर्व नागरिक समान आहेत, असे संविधानात लिहिले आहे. प्रत्येक भारतीयाला स्वप्न पाहण्याचा आणि भविष्य घडवण्याचा अधिकार असायला हवा, असे संविधानात लिहिले आहे. भारतात आज 50 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. भाजपची नोटाबंदी आणि जीएसटी भारतातील गरीब जनतेला उद्ध्वस्त करण्याचे साधन आहे. जीएसटी भारतातील गरीब लोक भरतात. तर, पंतप्रधान मोदींनी अब्जाधीशांची 16 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली,' असा दावाही राहुल गांधींनी यावेळी केला.
90 टक्के लोकसंख्येला प्रतिनिधित्व नाही
राहुल पुढे म्हणतात, 'आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलची किंमत कमी होत असली तरी भारतात पेट्रोलचे दर वाढतच आहेत. संविधानापूर्वी या देशात गरिबांना कोणतेही अधिकार नव्हते. स्वातंत्र्यापूर्वी गरिबांना कोणतेही अधिकार नव्हते. भाजप-आरएसएसला स्वातंत्र्यापूर्वीचा भारत हवा आहे. या देशात तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. रोजगाराशिवाय पदवीचा कागद फक्त कचरा आहे. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत, म्हणून त्यांना मंदिरात जाऊ दिले जात नाही. राम मंदिराच्या कार्यक्रमात कोणी दलित मागासलेला दिसला का? राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनालाही उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. देशातील 90 टक्के लोकसंख्येला प्रतिनिधित्व नाही, हा अन्याय नाही का?' असा सवालही त्यांनी यावेळी केला.