नवी दिल्ली - भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला करत खडे बोल सुनावले आहेत. अगोदरच्या सरकारला आपण दोष देऊ शकत नाही, कारण आपल्याला पुरेपूर संधी मिळाली आहे असं सांगत यशवंत सिन्हा यांनी भाजपा सरकारला सुनावलं आहे. 'अर्थव्यवस्था कमकुवत असताना नोटाबंदीचा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती. अजून नोटाबंदीचे परिणाम समोर आले नसताना जीएसटी लागू करणे दुसरा धक्का होता', अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.
एएनआयला आज सकाळी दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं यशवंत सिन्हा यांनी सांगितलं. 'अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे यामध्ये काही दुमत नाही. आम्ही नेहमी युपीएला जबाबदार धरत होतो. मात्र आता जेव्हा सत्तेत येऊन 40 महिने झाले आहेत, त्यानंतरही आधीच्या सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही', असे खडे बोल यशवंत सिन्हा यांनी सुनावले आहेत.
'गेल्या अनेक दिवसांपासून भारताची अर्थव्यवस्था कोलमडत होती. 2014 च्या आधी जेव्हा मी प्रवक्ता होतो, तेव्हा आम्ही पॉलिसी पॅरालिसिस असल्याची टीका करायचो. पण आता आम्ही दरवेळी आधीच्या सरकारला दोष देऊ शकत नाही. आम्हाला पुरेपूर संधी मिळाली आहे', असं सांगत यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
'मी जीएसटीचा समर्थक होती. केंद्र सरकारला घाई लागली होती, त्यामुळे त्यांना जुलैमध्येच अंमलबजावणी करायची होती. पण आता जीएसटीएन (Goods and Services Tax Network) अपयशी ठरत आहे', अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे. 'जर तुम्ही काँग्रेसचे अर्थमंत्री सोडलेत, तर सातवेळा अर्थसंकल्प मांडणार मी एकमेव आहे. आज देशातील जनेतला रोजगार हवा आहे, पण ज्याला कोणाला विचारावं तो म्हणतो रोजगार उपलब्ध नाही', असंही यशवंत सिन्हा बोलले आहेत.
'सर्वात पहिलं काम जे केंद्र सरकारने करणं गरजेचं होतं ते म्हणजे बँकांची परिस्थिती सुधारणे, ज्याची आम्ही लोक अजून वाट पाहत आहोत. कदाचित राजनाथ सिंह आणि पियूष गोयल यांना अर्थव्यवस्थेची जास्त चांगली माहिती आहे, त्यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं त्यांना वाटतं', असं यशवंत सिन्हा बोलले आहेत.
याआधी यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींवर टीका करताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, असं म्हटलं होतं. अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली असं यशवंत सिन्हा बोलले होते. माजी केंद्रीय वित्तमंत्री राहिलेले सिन्हा पंतप्रधान मोदींच्या राजवटीत अडगळीत गेले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले होते.
पंतप्रधानांचे पाच पांडवसिन्हा यांनी लिहिलं होतं, पंतप्रधान चिंतेत आहेत. पंतप्रधान वित्त मंत्रालयासोबत बैठक घेणार होते, पण कधी ते माहीत नाही. वित्तमंत्री नव्या ‘पॅकेज’ची भाषा करीत आहेत. लोक श्वास रोखून त्याची प्रतीक्षा करीत आहेत. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची फेररचना केली जाणे, एवढेच काय ते नवीन आहे. आता या सल्लागार परिषदेने पांडवांप्रमाणे महाभारताचे नवे युद्ध आपल्याला जिंकून द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे.
भीतीपोटी गप्पआता मी जाहीरपणे बोललो नाही तर देशाविषयीच्या कर्तव्यात कसूर केल्यासारखे होईल, या भावनेने मी हे लिहित आहे. या लेखात मी जे म्हणणे मांडत आहे तशाच भावना भाजपा आणि त्याबाहेरच्याही अनेक लोकांच्या मनात आहेत, पण हे लोक भीतीपोटी बोलत नाहीत, अशी माझी खात्री झाली आहे, असे सिन्हा यांनी लिहिले होतं.