उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मातेची हतबलता दिसून आली. तिच्या 22 वर्षीय मुलाचा आजारपणामुळे मेरठच्या रुग्णालयात मृत्यू झाला. पण तिच्याकडे आपल्या मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसेही नव्हते. त्यानंतर निराधारांचे वारस म्हटल्या जाणाऱ्या साक्षी वेलफेअर ट्रस्टच्या अध्यक्षा शालू सैनी यांनी पुढे जाऊन या असहाय्य आईच्या मृत मुलावर अंत्यसंस्कार केले.
एक वर्षापूर्वी शारदा नावाची महिला आपल्या 22 वर्षांचा मुलगा राहुल यादव याच्यासोबत आझमगड येथून नोकरीसाठी मुझफ्फरनगरला आली होती. येथे आल्यानंतर राहुल एका कारखान्यात काम करू लागला, मात्र काही महिन्यांपूर्वी राहुलच्या फुफ्फुसात संसर्ग झाला, त्यामुळे तो आजारी राहू लागला. जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर राहुलची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी त्याला मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले होते. मात्र तेथे उपचार सुरू असताना 20 मे रोजी राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राहुलची आई शारदा यांनी कसा तरी आपल्या मुलाला मेरठहून मुजफ्फरनगर स्मशानभूमीत आणले होते, मात्र येथे आल्यानंतर त्यांच्याकडे मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. माहिती मिळाल्यानंतर 21 मे रोजी नगर कोतवाली परिसरात असलेल्या स्मशानभूमीत पोहोचलेल्या साक्षी वेलफेअर ट्रस्टच्या अध्यक्षा क्रांतिकारी शालू सैनी यांनी या मातेचा मुलगा राहुल यादव यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
रात्री फोन केला...
याबाबत अधिक माहिती देताना शालू सैनी यांनी सांगितले की, मला फोन आला की स्मशानभूमीबाहेर एक महिला रात्रभर आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन बसली आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास मला हा फोन आला. त्यामुळे त्याच वेळी मी माझी स्कूटी घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. यानंतर आम्ही संपूर्ण विधी करून राहुलचे अंत्यसंस्कार केले.
शालू सैनी यांनी कोविड-19 दरम्यान या कामाची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासून त्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. असे म्हणतात की शालू सैनी यांनी आतापर्यंत अशा हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत ज्यांचा कोणीही वारसदार नव्हता. आता परिस्थिती अशी आहे की, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीसही शालू सैनीची मदत घेतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.