नवी दिल्ली - पुण्यात आपण प्रक्षोभक भाषण अजिबात केले नाही. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला लक्ष्य करत आहेत, असे स्पष्ट करतानाच दलितांवरील अत्याचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का बाळगून आहेत? असा सवाल गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार व दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. पुण्यामध्ये ३१ डिसेंबर रोजी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जिग्नेश मेवानी आणि जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेवानी म्हणाले की, उना येथील प्रकरण असो की, कोरेगाव भीमाचे असो, मोदी याबाबत शब्दही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपच्या जागा ९९ पर्यंत कमी झाल्यानंतर भाजप व संघ मला लक्ष्य करीत आहेत.निवडून आलेल्या दलित नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर, देशातील गरीब दलितांची काय अवस्था असेल, याची कल्पना केली जाऊ शकत नाही. या लोकांना सुरक्षित कसे काय वाटू शकेल?युवा हुंकार रॅलीप्रगतिशील विद्यार्थी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांसह आपण ९ जानेवारी रोजी दिल्लीत ‘युवा हुंकार’ रॅली काढणार आहोत. एका हातात मनुस्मृती आणि दुसºया हातात राज्यघटना घेऊन आपण पंतप्रधानांच्या कार्यालयात जाणार असून, यापैकी काय निवडणार? असा सवाल त्यांना करणार आहोत, असेही मेवानी यांनी जाहीर केले.एकीकडे पंतप्रधान डिजिटल इंडिया, चंद्रावरील पाण्याचा शोध, मंगळावरील वस्ती यांच्या गोष्टी करतात, तर दुसरीकडे आपल्या समाजाला मात्र समानतेसाठी संघर्ष करावा लागत आहे, असेही मेवानी म्हणाले.
प्रक्षोभक भाषण केलेच नाही ! जिग्नेश मेवाणींचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:31 AM