-बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबमध्ये यंदा झाडूच्या राजकारणाने सर्व दिग्गजांना साफ केले आहे. आम आदमी पार्टीच्या लाटेत ना काँग्रेसचा दलित मुख्यमंत्र्यांचा मुद्दा चालला, ना अकाली दल आणि भाजपचा ‘डेरा फॅक्टर’ चालला. आप पूर्ण बहुमतासह राज्यात सरकार स्थापन करणार आहे.
मान ४५ हजार मतांनी विजयीभगवंत मान ४५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. तर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल, माजी कॅबिनेट मंत्री बिक्रमसिंग मजीठिया, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल आणि अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांचा पराभव झाला आहे.
विजयी झालेल्या आम आदमी पक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन. मतदारांनी दिलेला काैल आम्ही स्वीकारला आहे. आम्ही आमच्या पराभवाची मीमांसा करू. विरोधी पक्ष म्हणून पंजाबमध्ये काॅंग्रेस पक्ष यापुढील काळात सकारात्मक काम करेल. - नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
राहुल गांधींचा निर्णय ठरला चुकीचाकॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निर्णय चुकीचा ठरला. अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे नुकसान झाले. अकाली दलाचा भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णयही तोट्यातला निर्णय ठरला आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या संयुक्त किसान मोर्चालाही निवडणुकीत कोणताही लाभ झाला नाही.
चन्नी आणि सिद्धू पराभूतकाँग्रेसने चन्नी यांना हा विचार करून खुर्ची दिली की, पंजाबातील ३२ टक्के मतदारांचे समर्थन मिळेल; पण सत्ता मिळणे दूरच, चन्नी स्वत: दोन्ही जागांवर पराभूत झाले. चन्नींच्या प्रत्येक निर्णयावर बोट ठेवणारे सिद्धूही विधानसभेत पोहोचू शकले नाहीत.
अरविंद केजरीवाल : कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा काँग्रेस पक्षत्याग आणि मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील बेबनाव हे मुद्दे आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडले. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना पंजाबी मतदारांसमोर आपचा पर्याय जोरदारपणे मांडता आला. त्यातच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून भगवंतसिंग मान यांना पेश केल्याने मतदारांनी झाडूलाच सर्वाधिक पसंती दिली. पंजाबातील बहुतांश मतदारांनी आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रारूप अनुभवले असल्याने केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. म्हणूनच या पक्षाला बहुमत मिळाले.