नवी दिल्ली /कथुआ : ज्या आठ वर्षांच्या बकरवाल समाजाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला, नंतर तिची हत्या केली, तिचे दफन गावात करू देण्यास गावकऱ्यांनी नकार दिल्याचे उघडकीस आले आहे. गावक-यांच्या भीतीने तिचे कुटुंब तसेच बकरवाल समाजाचे सारे लोकच गाव सोडून अन्यत्र निघून गेले आहेत. गावकºयांनी मात्र आमच्या शेतात दफन करणे आम्हाला नको होते, असे म्हटले आहे.या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले असून, दिल्ली उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीची वैयक्तिक माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.बकरवाल समाजाची सारी कुटुंबे रासना गाव सोडून निघून गेली आहेत. त्यात मुलीचे आई-वडील, भाऊ यांचा समावेश आहे. तिचे वडील म्हणाले की, या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम असा रंग का दिला जात आहे, हेच समजत नाही. माझ्या मुलीला डावा हात व पाय कोणता आणि उजवा कोणता हेही समजत नव्हते. तिला हिंदू व मुसलमान यांच्यातील फरकही माहीत नव्हता. तिच्यावरून अशा प्रकारे राजकारण करणे योग्य नाही. मात्र तिचे पालक व सर्वच बकरवाल कुटुंबे यांना पुन्हा चार महिन्यांनी गावात यायची इच्छा आहे.हिंदू गावकºयांना मात्र बकरवाल समाजाचे लोक गावात नको आहेत. ते मुस्लीम आहेत, त्यांना गावात मशीद बांधायची होती, ते पाकिस्तानधार्जिणे होते, असा आरोप गावातील काही हिंदूंनी केला. बकरवाल गावकºयांना मात्र आरोप मान्य नाही. आपल्याला पुन्हा गावात प्रवेश मिळेल का, याचीच त्यांना भीती वाटत आहे.या प्रकरणाची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. या बलात्कारप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याच्या कामात वकिलांनी हस्तक्षेप केला होता. तसेच बंदही केला होता. त्याची दखल घेत, जम्मू व काश्मीर बार असोसिएशनने जम्मू बंदसंबंधीची कागदपत्रे मागवून घेतली आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने पीडित मुलीची ओळख पटवणारी माहिती देणाºया प्रसिद्धी माध्यमांविषयी नाराजी व्यक्त करीत, यापुढे तसे न करण्यास सांगितले आहे.>घडले ते लज्जास्पदमाजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, भाजपाच्या मीनाक्षी लेखी, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष जी. ए. मीर यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करताना आरोपींना कडक शिक्षा व्हायलाच हवी, असे म्हटले आहे. अभिनेते कमल हासन, सोनम कपूर तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही या प्रकारामुळे आपणास लाज वाटते, असे म्हटले आहे.>भाजपा आमदाराची मुक्ताफळेया प्रकरणावरून केवळ जम्मू व काश्मीरमध्येच नव्हे, तर देशभर वातावरण तापत चालले आहे. भाजपाच्या जम्मूमधील आमदाराने मात्र पाकिस्तानी अतिरेक्यांचा हा डाव असल्याची मुक्ताफळे उधळली. अल्पवयीन मुलीवरील बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती व्हायला हवी, असे केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी म्हणाल्या.
बलात्कार, हत्येनंतर तिच्या दफनासाठी जागा द्यायला गावकरी नव्हते तयार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:30 AM