ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या परतीच्या बातम्या पुन्हा जोर पकडू लागल्या असून दोन वर्षांपूर्वीच दाऊदने भारतात परत येण्याची तयारी दर्शवली होती, असे खळबळजनक वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दिल्लीतील वकील व काँग्रेसचा नेता असलेल्या इसमाने हा गौप्यस्फोट केला असल्याचे या वृत्तात म्हटले असून दाऊदच्या या प्रस्तावावबात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्येही चर्चा झाली. मात्र दाऊदच्या अटींवर त्याचा खटला चालवणे हे जोखमीचे ठरेल असे लक्षात आल्याने तत्कालीन सत्ताधारी नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असे त्या नेत्याने म्हटले आहे.
या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या दाऊदला काही काळ त्याच्या कुटुंबियांसोबत व्यतीत करायचा होता, त्यामुळेच १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांनंतर दोन दशकांनी २०१३ मध्ये दाऊदने भारतात परत येण्याची तयारी दर्शवत बाँबस्फोटीसंबंधीच्या खटल्यास सामोरे जायची तयारी दर्शवली. दाऊद टोळीशी संबंधित असलेले अनेक खटले चालवण्याचा अनुभव असलेल्या या काँग्रेस नेत्यामार्फतच दाऊदने हा सरकारला हा प्रस्ताव दिला होता. त्याबाबत त्या काँग्रेस नेत्याने प्रथम काँग्रेस नेतृत्वाला कल्पना देत या विषयावर चर्चा केली व त्यानंतर तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्याशीही चर्चा करण्यात आली. अखेर अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवण्यात आला, मात्र दाऊदच्या अटी मानून त्याच्यावर खटला चालवणे हे अत्यंत जोखमीचे ठरेल असे सांगत तो फेटाळण्यात आला.
यासंबंधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे इ-मेलद्वारे विचारणा करण्यात आली होती, मात्र अशा कोणत्याही विषयावर चर्चा झाल्याचे आठवत नाही असे उत्तर देत त्यांनी हातवर केले आहेत. तर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन प्रतिक्रियेसाठी उपलब्ध नव्हते.
१९९३ च्या साखली बाँबस्फोटानंतर दाऊद दुबईला पळून गेला, त्यानंतर त्याच्या वकिलांनी दाऊदचे वकीलपत्र तयार करत मुंबई बाँबस्फोटांचा खटला दिल्लीत चालवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. या स्फोटप्रकरणात आपले नाव नाहक गोवले गेले असा दाऊदचा दावा होता व त्यामुळेच त्याला याप्रकरणी त्याचे 'निर्दोषत्व' सिद्ध करायची इच्छा होती, असेही या काँग्रेस नेत्याने म्हटल्याचे वृत्त या वृत्तपत्राने दिले आहे.