Rahul Gandhi on Narendra Modi Speech: मोदींच्या बोलण्यात सत्य दिसत होते...; राहुल गांधी असे का बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 09:01 PM2023-02-08T21:01:38+5:302023-02-08T21:02:23+5:30
Rahul Gandhi reaction on Narendra Modi Speech: हे अधिवेशन ज्या अदानींमुळे गाजले, त्या अदानीचे मोदींनी एकदाही नाव घेतले नाही.
संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी हे अधिवेशन ज्या अदानींमुळे गाजले, त्या अदानीचे मोदींनी एकदाही नाव घेतले नाही. मोदींनी कालच्या राहुल गांधींच्या अदानींवरील भाषणाचा खरपूस समाचार घेतला. यावर राहुल यांची प्रतिक्रिया आली आहे.
मोदींनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मी कोणतेही कठीण प्रश्न विचारले नव्हते. अदानी तुमच्यासोबत किती वेळा परदेश दौऱ्यावर गेले, ते तिथे कितीवेळा भेटले, मला हे साधे प्रश्न पडले होते पण पंतप्रधान मोदींनी त्यांची उत्तरे दिली नाहीत, असे राहुल म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाशी मी सहमत नाही. त्यांनी जे सांगितले त्यात सत्यता दिसते. तपासाबाबत पंतप्रधान मोदी बोलले नाहीत. जर अदानी आणि पीएम मोदी मित्र नसतील तर त्यांनी मी चौकशी करतो, असे म्हणायला हवे होते. पण ते देखील बोलले नाहीत. संरक्षण उद्योगात चालणाऱ्या शेल कंपन्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. या शेल कंपन्यांच्या माध्यमातून बेनामी पैसा फिरवला जातो. यावर पंतप्रधान मोदी काहीही बोलले नाहीत, याचा अर्थ पंतप्रधान मोदी स्वतःच त्यांना संरक्षण देत आहेत. याप्रकरणी आपण चौकशी करू असे खुद्द पंतप्रधानांनीच सांगायला हवे होते, असा आरोप राहुल यांनी केला.