लखनौ - राजकीयदृष्टा देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीमध्ये विजय मिळवून राज्यातील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे. दरम्यान, या अटीतटीच्या लढतीत उत्तर प्रदेशात बाजी कोण मारणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं भाकित केलं आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचे भाकित केले आहे.
शरद पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमधील चित्र बदलले आहे. उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार आहे, अशी चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशमधील जमतेलाही बदल हवा आहे. मी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील ८० टक्के जनता आपल्यासोबत आहे आणि केवळ २० टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते २० टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोण्या एका गटाचा नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेलं सरकार बाजूला सारणं महत्त्वाचं आहे. देशात सर्वधर्मसमभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करावंच लागेल, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
तसेच आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि आणखी काही छोट्या-मोठ्या पक्षांसोबत आघाडी करुन निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मी स्वत: देखील उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.