संजय शर्मानवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक १२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांपर्यंत संपर्क वाढविणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशातील ३५ कोटी मुस्लिमांमध्ये स्थान निर्माण करणे. तसेच, देशाची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी देशात चर्चा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे.
१२ ते १४ मार्च या कालावधीत हरयाणातील समालखा येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह, आरएसएसच्या सर्व संघटना, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हेही यावेळी उपस्थित राहतील. देशातील सर्व प्रांतीय प्रचारक, प्रादेशिक प्रचारक, विभाग प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांसह सुमारे १४०० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत.
तीन दिवसीय बैठकीत तीन ते पाच ठराव मंजूर केले जातील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशाच्या कानाकोपऱ्यात स्थिती मजबूत करणे हा बैठकीचा उद्देश आहे. देशात सुमारे एक लाख नवीन ठिकाणी शाखा उघडण्याचीही योजना आहे.
आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी सांगितले की, देशातील ३५ कोटी मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हेही मुस्लिम समुदायातील लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्याशी चर्चाही सुरू आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्तावही बैठकीत येऊ शकतो. विजयादशमीच्या संबोधनात मोहन भागवत म्हणाले होते की, वाढती लोकसंख्या हे देशावरचे ओझे आहे आणि संपत्तीही आहे. २०२५ मध्ये आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आरएसएसमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. जे काही मोठे बदल घडणार आहेत ते २०२४ नंतरच होतील.