चंदीगड : नव्या कृषी कायद्याविरोधात हरियाणातील कर्नाल येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर २८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन मागे घेतले आहे. लाठीमारात मरण पावलेल्या सुशील काजल या शेतकऱ्याच्या कुटुंबातील दोघा व्यक्तींना जिल्हा प्रशासनामध्ये नोकरी देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले.
चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात केेलेले धरणे आंदोलन मागे घेतले आहे. २८ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची निवृत्त न्यायाधीशाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या लाठीमार प्रकरणी आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांनी निभावलेल्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आयुष सिन्हा हे रजेवर असतील.
नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या हरियाणातील शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांचा एकही कार्यक्रम राज्यात होऊ द्यायचा नाही, असा निर्धार केला होता. कर्नाल येथे २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर भाजप बैठकीसाठी कर्नाल येथे येणार होते. खट्टर यांचा निषेध करण्यासाठी शेतकरी बस्तरा टोलनाक्याजवळ जमा झाले. त्यावेळी त्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात एक शेतकरी मरण पावला व १० शेतकरी जखमी झाले होते.