नवी दिल्ली , दि. 27 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज 35 व्यांदा 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केलं. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हरियाणामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही, सरकार असो किंवा देश हिंसा खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता पंतप्रधान रेडीओच्या माध्यमातून देशाला संदेश देत असतात. आज कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. भारत हा महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांचा देश आहे, या देशात कोणत्याच प्रकारच्या हिंसेला थारा नाही. धर्म, श्रद्धा राजकारण किंवा इतर कोणत्याही कारणाखाली हिंसाचार अथवा कायदा हातात घेतला जाऊ दिला जाणार नाही. दोषी असलेल्यांना कायदा शिक्षा देणारच आणि सर्वांना कायद्यासमोर झुकावं लागेल अशा शब्दात पंतप्रधानांनी खडेबोल सुनावले.
25 ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टान दोषी ठरवलं. त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिसाचार उफाळला. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंसाचाराच्या या घटनेच्या पार्श्वभूमिवर मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं ते म्हणाले.