नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली. भारताकडे यावेळी जर उच्च क्षमतेची विमाने असती तर पाकिस्तानचे मोठे नुकसान करता आले असते, असे संरक्षण विभागाने एका अहवालामध्ये म्हटले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे. यामध्ये भारताने पुलवामा हल्ल्याविरोधात बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला केला होता. या पुलवामा हल्ल्यांमध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते. तर भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये बालाकोटमधील दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले होते.
भारतीय वायुसेनेने या घटनांचा अभ्यास केला आहे. पाकिस्तानी हवाई दल 1999 च्या कारगील युद्धानंतर सातत्याने सैन्याची ताकद वाढवत आहे. दहशतावादाचा बिमोड करण्याच्या नावावर अमेरिका, चीन यांच्याकडून नवनवीन तंत्रज्ञान घेत आहे. या तुलनेत भारताला हवाई युद्धासाठी आपली ताकद वाढविण्याची गरज आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेने दिलेल्या एफ -16 विमानांमुळे पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. कारण त्या विमानांमध्ये एम्राम मिसाईल लावलेल्या आहेत. भारताकडे हवेतून हवेत मारा करता येऊ शकणारी बीवीआरएएएम मिसाईल आणि एस-400 सुरक्षा प्रणालीने युक्त असलेले राफेल विमान आल्यास भारताला पाकिस्तावर मात करणे सोपे जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.