इस्लामाबाद: भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस देण्यास पाकिस्ताननं नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं झटका दिल्यानंतर पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस दिला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं आज साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस दिला जाणार नाही, अशी माहिती दिली. 2 सप्टेंबरला जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस देण्यात आला होता. त्यावेळी राजदूत गौरव अहलुवालिया यांनी अज्ञात स्थळी जाधव यांची भेट घेतली होती. एका तुरुंगात ही भेट झाली. निश्चित वेळेच्या एक तासानंतर पाकिस्ताननं जाधव यांना अहलुवालिया यांना भेटू दिलं. ही भेट परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात होईल, असं पाकिस्ताननं आधी सांगितलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी पाकिस्ताननं भेटीचं ठिकाण बदललं. भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र हा व्हिडीओ पाकिस्ताननं दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.
कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस देण्यास पाकिस्तानचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 2:45 PM