नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या गुरुवायूर मंदिरात पुजा करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मंदिराच्या कार्यालयाला एक लिफाफा पाठविण्यात आला होता. या लिफाफ्यातील पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती अशी माहिती मिळत आहे. एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जून रोजी केरळच्या गुरुवायूर मंदिरात गेले होते. त्याआधी 7 जूनला हे पत्र मंदिराच्या कार्यालयाला पाठविण्यात आलं होतं. मंदिर कार्यालयाला मिळालेल्या लिफाफ्यामध्ये 500 रुपयांची नोट होती. या नोटेवर मल्ल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यावर इंग्रजी भाषेत काही शब्द होते मात्र ते शब्द काही कोड असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे पत्र मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली आहे. गुप्तचर यंत्रणेने या पत्राला गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे हे पत्र कोणी लिहिलं याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाआधी भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाला एक पत्र आलं होतं. ज्यात मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नावानं हे निनावी पत्र आलं होतं. त्यावर भाजपाच्या मुख्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठीत लिहिलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात येणार आहेत.
ही चिठ्ठी पाठवणाऱ्यानं आपलं नावंही दिलं होतं. त्या चिठ्ठीवर पाठवणाऱ्याचा पत्ताही देण्यात आला होता. या धमकीपत्रात राकेश टांक, भैय्या पारीक, आणखी एकाचा उल्लेख होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरचा होता. चिठ्ठीमध्ये जयपूरमधल्या आमेर रोडवरच्या कच्चा बंधा, गणेश कॉलनीतील शिवाड भागाचा पत्ता देण्यात आला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी चिठ्ठी मिळाल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या हवाली केली होती असं सांगितलं होतं.