नवी दिल्ली: आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी 2019 नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. उन्नाव येथील एका कार्यक्रमात साक्षी महाराज बोलत होते.
'मोदी नावाची त्सुनामी आली आहे. देशात जागृती आली आहे. मला वाटते की, या निवडणुकीनंतर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत. फक्त हीच निवडणूक आहे. त्यामुळे देशासाठी तुम्ही नेतृत्व निवडू शकता’, असे धक्कादायक वक्तव्य साक्षी महाराज यांनी केले आहे.
दरम्यान, साक्षी महाराज यांच्या आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यास देशातील सार्वत्रिक निवडणुका बंद करेल असा आरोप केला आहे. अशोक गेहलोत म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष ही लोकसभा निवडणुका जिंकल्यास देशात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होण्याची शाश्वती नाही'.