पलवल (हरियाणा) - हरियाणामधील पलवल येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना एक विचित्र घटना घडली आहे. नुकतेच निधन झालेल्या येथील मार्केट कमिटीच्या चेअरमनांच्या वडलांवर अंत्यसंस्कार सुरू असताना उपस्थितांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे स्मशानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 200 जणांचा मधमाशांना चावा घेतला. तर सुमारे 50 जण मधमाशांच्या चाव्यामुळे जखमी झाले. त्यानंतर उपस्थितांनी संरक्षणासाठी हेल्मेट परिधान करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्याचे झाले असे की, ठाकूर बीर सिंह यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी सुरू असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. सुरुवातील या प्रकाराकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही. मात्र मधमाशांनी डंख मारण्यास सुरुवात केल्यावर उपस्थितांची पळापळ सुरू झाली. स्मशानासेजारी पार्क केलेल्या गाड्यांमध्ये बसून लोकांनी स्वत:ला कैद करून घेतले. मात्र या धावपळीत सुमारे 50 जणांना मधमाशांच्या डंखांचा प्रसाद मिळाला. त्यातील 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मधमाशांना पळवून लावण्यासाठी नगरपालिकेकडून तातडीने धूर फवारणी करण्यात आली. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी हेल्मेट परिधान करून पुन्हा स्मशान गाठले. अखेर संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे आणि हेल्मेट घालून मृताच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.
त्यामुळे हेल्मेट घालून करावे लागले पार्थिवावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 5:08 PM