भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपुष्टात येत आहे. सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावेळच्या निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने यावेळी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच काँग्रेस आणि भाजपा दोन्हीकडून तितकाच आक्रमक प्रचार पाहायला मिळाला. मात्र प्रचाराच्या या रणधुमाळीदरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ते निवडणूक लढवत असलेल्या बुधनी मतदारसंघात स्वत:च्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नाही. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस उमेदवार अरुण यादव यांनी येथे प्रचाराची राळ उडवली आहे.
बुधनी येथून शिवराज सिंह चौहान यांना आव्हान देणार काँग्रेस उमेदवार अरुण यादव यांनी येथे प्रचाराचा जोर लावला आहे. येथील काँग्रेसच्या प्रचाराची धुरा राजकुमार पटेल यांच्याकडे आहे. मात्र काँग्रेसची स्थानिक संघटना यादव यांना पुरेशी साथ देत नसल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केला. मात्र अरुण यादव हे आपल्या विजयासाठी निश्चिंत आहेत. शिवराज सिंह चौहान आणि अरुण यादव हे दोघेही ओबीसी समुदायातील आहेत. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या किरार जातीपेक्षा या मतदारसंघात यादव मतदारांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे जातीय समीकरण जुळवून तसेच लोकांच्या नाराजीला हवा देऊन विजय मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 1990 साली येथून निवडणूक जिंकून विधानसभा गाठली होती. त्यानंतर 2008 आणि 2013 साली त्यांनी याच मतदारसंघामधून दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही सहजपणे निवडणूक जिंकण्याचा विश्वास शिवराज सिंह चौहान यांना आहे. त्यामुळेच आपल्या मतदारसंघात फारसी शक्ती वाया न घालवता राज्यातील इतर भागांमध्ये प्रचार करण्याला चौहान यांनी प्राधान्य दिले आहे.
शिवराज सिंह चौहान हे केवळ नामांकन भरण्यासाठी या मतदारसंघात आले होते. त्याआधी त्यांनी नर्मदा नदी आणि कुलदेवतेच्या दर्शनासाठी या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर येथील प्रचाराबाबत त्यांनी फारशी चिंता केलेली नाही. आता शिवराज सिंह चौहान मंगळवारी येथे येण्याची शक्यता असून, ते गुरुवारपर्यंत थांबतील, असे सांगण्यात येत आहे.