नवी दिल्ली - मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी विधेयकांवरुन दिल्लीतील रस्त्यांवर आणि संसदेतही चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, अद्यापही शेतकरी आणि सरकार यांच्यातीतल चर्चेतून अंतिम तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षही सातत्याने केंद्र सरकारला तीन कृषी कायद्यांवरुन कोंडीत पकडत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नेहमीच यासंदर्भात ट्विट करतात. आता, पुन्हा एकदा तिन्ही कृषी कायद्यांबाबत राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. मात्र, त्यात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी होणार नसल्याने या राज्यांमध्ये आंदोलन होणार नसल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले आहे. या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. राहुल गांधींनी ट्विट करुन आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं म्हटलंय.
अन्नदाता शेतकऱ्याचं शांतीपूर्ण आंदोलन देशाच्या हितासाठीच आहे, हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक आहेत, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दिल्लीतील उप्रदव हा पूर्वनियोजित कट?
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या उपद्रवाचा कट आधीपासून ठरवण्यात आला होता. असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या SIT चौकशीतून समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. यांचा उद्देश आंदोलकांमध्ये उपस्थित राहून उपद्रव सुरू करणे आणि नंतर आंदोलन कर्त्यांना उपद्रवात सामील करणे, असा होता.
हिंसाचार प्रकरणात 124 हून अधिक लोकांना अटक -
दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचची SIT 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 124 जणांना अटक केली आहे. तर 44 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित 44 प्रकरणांपैकी 14 प्रकरणांचा तपास SIT करत आहे. या शिवाय पोलिसांकडून 70 हून अधिक लोकांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत.