नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीमध्ये जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढल्यानंतर आता संघटन स्तरावर मोठ्या फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत राज्यांमध्ये व भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये मोठे बदल दिसून येतील. त्यासाठी, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तारही होणार असून या विस्तार शिंदे गटाच्या तीन खासदारांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदीएकनाथ शिंदे विराजमान झाले. त्यानंतर, शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदारांनीएकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे, या खासदारांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर आता सार्वत्रिक निवडणुका व ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षात मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. तथापि, आताही म्हटले जात आहे की, मोदी मंत्रिमंडळातील फेरबदल व भाजपमधील संघटन स्तरावरील बदल एकाचवेळी केले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन लोकसभेच्या एकेका जागेबाबत बदल करीत आहेत. त्यामुळे, महाराष्ट्र हे सर्वाधिक खासदार पाठवणारं दुसरं राज्य आहे, म्हणूनच येथील सह्योगी शिवसेनेच्या खासादारांना मंत्रीपद देऊन राजकीय वजन वाढवण्याचाही प्रयत्न मोदी सरकारचा आहे. तर, मोदी सरकारचे काही केंद्रीय मंत्री भाजपच्या संघटनेत पाठविण्याची चर्चा सुरू आहे.
मंत्रीपदासाठी ३ नावे समोर
शिंदे गटाकडून तीन खासदारांची नावे पुढे आली असून या तीन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये, २ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रीपद शिंदे गटाला मिळणार आहे. या मंत्रीपदासाठी शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, खा. श्रीरंग बारणे आणि खासदार प्रतापराव जाधव यांची नावे समोर आली आहेत. राहुल शेवाळे यांना मंत्रीपद देऊन आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबईत शिंदे गटाचे आणि भाजपचे हात बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे. तर, श्रीरंग बारणे यांना मंत्रीपद देत पवारांच्या बालेकिल्ल्यात आणि प. महाराष्ट्रात शिंदे गटाला ताकद देत भाजपलाही वाढविण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा आहे. तसेच, विदर्भातील नेते प्रतापराव जाधव यांनाही मंत्रीपद देऊन प्रादेशिक समतोल राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.