हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 01:18 PM2019-03-13T13:18:33+5:302019-03-13T13:21:23+5:30

2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे. 

These 5 issues can become headache for Narendra Modi | हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

Next

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात सर्व राजकीय पक्षांशी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या सारख्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी घोषित केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी पटकवणार याचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. मात्र लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी सोपी नसेल त्यामुळे भाजप निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी युपीएला सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं होतं. त्यावेळी देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट निर्माण होती. या लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे. 

उमेदवार निवडीपासून प्रचार यंत्रणेपर्यंत, सभांपासून रॅलीपर्यंत सर्वच बाबी भारतीय जनता पार्टी नियोजनबध्द पद्धतीने करत आहे. मात्र निवडणुकीत असे काही मुद्दे आहे जे नरेंद्र मोदी यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात 

1- राफेलवरुन रणकंदन 
काँग्रेसकडून राफेल विमान खरेदीचा मुद्दा निवडणुकीसाठी कळीचा मुद्दा ठरु शकतो, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीमध्ये आक्रमकरित्या राफेल मुद्दा मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले आहे. राफेल विमान खरेदीमध्ये घोटाळा झाला असून पंतप्रधान यांनी राफेल करारातून अनिल अंबानी यांचे खिसे भरण्याचं काम केले असा आरोप मोदींवर होत आहे. विमान बनविण्याचे कोणतंही ज्ञान आणि अनुभव नसताना मोदी सरकारने अनिल अंबानी यांच्या कंपनीला फायदा होईल म्हणून हे कंत्राट दिले. 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांच्या खिशात घातले, चौकीदाराने देशाला लुटले असा आरोप करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

2 - नोटाबंदी आणि जीएसटी  
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यत: काळा पैसा आणि दहशतवाद संपविण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी असे ऐतिहासिक निर्णय घेतले. नोटाबंदीने काळा पैशाला चाप बसला आणि जीएसटीमुळे करप्रणालीमध्ये सुलभता आली असा दावा भाजपकडून करण्यात येतो. मात्र विरोधकांनी नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली, जीएसटीमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले असा आरोप केला. 

3 - कर्जबुडवे उद्योगपती 
विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योजकांनी देशातील बॅंकांना लुटून परदेशात पळून गेले. बॅकांचे कर्ज बुडवून उद्योगपती परदेशात पळून गेले हे मोदी सरकारचे अपयश आहे. नीरव मोदी आणि विजय माल्ल्या पळून जाण्यामागे भाजपमधील मंत्र्यांचा हात आहे असा आरोपही काँग्रेसने केला आहे. 

4 - शेतकरी आणि बेरोजगारी 
नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी पिकांचा हमीभाव, शेतकरी कर्जमाफी आणि नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, देशात बेरोजगारी वाढली अशा विरोधकांच्या मुद्द्यावरून विरोधक निवडणुकीच्या काळात आक्रमक होणार आहेत. 

5- विरोधी पक्षांची महाआघाडी 
विविध राज्यांमध्ये भाजपविरोधी पक्षांची आघाडी होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, मायावती, अखिलेश यादव यांच्या सारखे विविध पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येऊन महाआघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उत्तर प्रदेशात एकमेकांचे कट्टर वैरी असलेले सपा-बसपा यांनी आघाडी केल्याने उत्तर प्रदेशात त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Web Title: These 5 issues can become headache for Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.