नवी दिल्ली - परराष्ट्र धोरणविषयक मुद्द्यांवर कल्पकतेने विचार करणारे आणि रुळलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्यायांच्या मांडणीसाठी प्रसिद्ध असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आशियान शिखर परिषदेच्या नेत्यांना आमंत्रण दिले आहे. त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलेही आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आशियान शिखर परिषदेचे नेते 2018 च्या प्रजासतत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत. 125 कोटी भारतीय त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 15 व्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या (आशियान) भारत शिखर परिषदेसाठी आणि 12व्या ईस्ट आशिया परिषदेला फिलिपिन्समध्ये आहेत. यावेळी काल (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात आशियाई देशांचे भविष्य आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका मिळून संपूर्ण जगाचे भविष्य बदलू शकतात, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच भारताच्या केलेल्या कौतुकासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले.