श्रीनगर - काश्मीरमधील वर्तमानपत्र रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे पत्रकार जगतासह देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. बुखारी यांच्या हत्येचा कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला असून, त्यांच्या हत्येमध्ये लष्कर ए तोयबाचा हात असल्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, अशी माहिती काश्मीरच्या आयजीपींनी दिली आहे.
शुजात बुखारींच्या मारेकऱ्यांविषयी माहिती देताना काश्मीरचे आयजीपी म्हणाले, चार मारेकऱ्यांनी शुजात बुखारी यांची हत्या केली. या मारेकऱ्यांचा मास्टरमाईंड सज्जाद गुल असून, तो मुळचा श्रीनगर येथील आहे. तसेच सध्या तो पाकिस्तानमध्ये आहे. सज्जाद गुल याला याआधी नवी दिल्ली आणि श्रीनगरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याने पकडण्याच आले होते. 2017 साली तो पाकिस्तानमध्ये पळाला असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस प्रसिद्ध केले आहे. तसेच या सज्जादनेच शुजाद बुखारी यांच्या हत्येपूर्वी सोशल मीडियावर शेअर होत असलेले ब्लॉग आणि पोस्ट तयार केल्या होत्या.
रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असावा, अशी शक्यता लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवली होती. काश्मीर खोऱ्यातील एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भट्ट यांनी हा अंदाज व्यक्त केला होता. यानंतर हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर हल्ल्याचा तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. याची जबाबदारी श्रीनगरच्या पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे.