ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील अनेक बँकांचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या उद्योगपती विजय माल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर काही तासांतच जामिनावर मुक्त झालेल्या विजय माल्याच्या भारताकडे प्रत्यार्पणाची चर्चा रंगलेली आहे. मात्र युनायटेड किंग्डममधील कायदेशीर प्रक्रिया आणि ब्रिटिश सरकारच्या भूमिकेमुळे माल्याला मुसक्या आवळून भारतात परत आणण्याच्या मार्गात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे.
अटकेची कारवाई झाल्यानंतर माल्याच्या भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक करून त्याला वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले असता तेथे कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता
म्हणून माल्याचे प्रत्यार्पण कठीण
1) भारत आणि युनायटेड किंग्डम यांच्यात प्रत्यार्पण करार झालेला असला तरी ब्रिटिशांच्या प्रत्यार्पण प्राधान्यक्रमामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाच्या देशात येतो. ब्रिटिशांच्या प्रत्यार्पण प्राधान्यक्रमामध्ये अमेरिका आणि युरोपियन देश यांना पहिली प्राथमिकता दिली जाते.
2) युनायटेड किंग्डमने विजय माल्याच्या प्रत्यार्पणास मान्यता दिल्यास भारताने याआधी प्रत्यार्पणाची मागणी केलेल्या अन्य कुख्यात आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबतही विचार करावा लागेल.
3) माल्या ब्रिटिश न्यायालयात आपण रायकीय वादाचा बळी ठरल्याचा दावा करू शकतो. त्याला आज सहज जामीन मिळाला आहे. आता तो ब्रिटीश पासपोर्टसाठीही अर्ज करू शकतो.
युनायटेड किंग्डमने याआधीही धुडकावले आहेत भारताचे प्रत्यार्पणाचे प्रस्ताव
युनायडेक किंग्डमने इतिहासात कधीही आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत भारताला अनुकूल भूमिका घेतलेली नाही. याआधी भारताने रायमंड वेर्ली, रवी शंकरन, वेलू बोपालन, अजय प्रसाद खैतान, वीरेंद्र कुमार रस्तोगी आणि आनंदकुमार जैन अशा आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी युनायटेड किंग्डम सरकारकडे मागणी केली होती. पण प्रत्येक वेळी भारताची मागणी तेथील सरकारकडून धुडकावून लावण्यात आली.