नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी नेहमी आपल्या अधिकाऱ्यांशी ताळमेळ ठेऊन निर्णय घेत असतात. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतानाही नरेंद्र मोदी यांनी नेहमीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. मागील पाच वर्षाच्या काळातही मोदींची अधिकाऱ्यांनासोबत घेऊन निर्णय घेतले. मात्र केंद्र सरकारमधील हे तीन अधिकारी आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त विश्वास आहे. हे अधिकारी कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पहिले अधिकारी आहेत यूपी कॅडरमधील 1967 बॅचचे आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्र. सध्या नृपेंद्र मिश्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्र जबाबदारी सांभाळतात. पंतप्रधान योजनांच्या कामांवर नृपेंद्र मिश्र यांचे विशेष लक्ष असतं. तसेच पंतप्रधान कार्यालय, इतर विभागीय मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ राखण्याचं महत्वाचं काम ते करतात. हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट आणि अलाहाबाद विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले नृपेंद्र मिश्र नोकरशाहीसोबत राजकारण या विषयावरही बारीक लक्ष देतात.
दुसरे अधिकारी आहेत गुजरात कॅडरमधील 1972 बॅचचे आयएएस अधिकारी पीके मिश्र. मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात पीके मिश्र यांच्याकडे अतिरिक्त प्रधान सचिवाचा कारभार आहे. पीके मिश्र यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. महत्वाच्या पदांवर उमेदवारांची निवड करणे यामध्ये पीके मिश्र यांची भूमिका महत्वाची मानली जाते. कॅबिनेट सचिवालयासोबत समन्वय राखणे, प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणणे. पंतप्रधानांच्या कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं काम ते करतात. अर्थशास्त्रात पीएचडी झालेले पीके मिश्र हे जागतिक बँकेच्या सल्लागार समितीमध्येही सहभागी आहेत.
तिसरे अधिकारी आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित डोवाल हे आयबीचे संचालकपदी 2004-05 दरम्यान होते. गुप्तचर यंत्रणांमध्ये अजित डोवाल यांचा महत्वाचा वाटा आहे. सर्जिकल स्ट्राईकपासून बालकोट एअर स्ट्राईकपर्यंतच्या अनेक निर्णयात अजित डोवाल यांचा सहभाग होता. देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोदींना कणखर नेता म्हणून प्रसिद्धी मिळाली. यात डोवाल यांनी पडद्यामागून मोठी भूमिका बजावली.