‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अजिबात जाता कामा नये’, काँग्रेसच्या या नेत्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:52 PM2023-12-28T17:52:54+5:302023-12-28T17:54:03+5:30
Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची निमंत्रणे अनेक मान्यवरांना पाठवण्यात येत आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्याही काही नेत्यांचा समावेश आहे. मात्र या सोहळ्याला जावे की न जावे यावरून काँग्रेसमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे.
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. तसेच या सोहळ्याची निमंत्रणे अनेक मान्यवरांना पाठवण्यात येत आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्याही काही नेत्यांचा समावेश आहे. मात्र या सोहळ्याला जावे की न जावे यावरून काँग्रेसमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरन यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने अयोध्येमधील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार मुरलीधर यांनी सांगितले की, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने या सोहळ्यामध्ये सहभानी न होण्याची विनंती राष्ट्रीय नेतृत्वाकडे केली आहे. मात्र केरळ प्रदेश काँग्रेसचे प्रमुख के. सुधाकरन यांनी आपल्याला याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगितले आहे. समारंभात भाग घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरोधात मुस्लिमांमध्ये दबाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुरलीधरन यांनी सांगितले की, या मुद्द्यावर राज्याच्या कार्यकारिणीच्या स्थितीबाबत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांना कल्पना देण्यात आली आहे.
मुरलीधरन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत या सोहळ्यामध्ये सहभागी होता कामा नये. हा पक्षाच्या राज्य नेतृत्वाचा निर्णय आहे. तसेच त्याबाबतच्या भावना वेणुगोपाल यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. मात्र काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून, तो भाजपाविरोधी आघाडीचं नेतृत्व करत आहे. आता या प्रकरणातही राष्ट्रीय नेतृत्व त्यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.