Baba Ramdev on Mamata Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे, आरामयादी आयुष्य सोडून ममताने संन्यास घेतला आहे. 24 वर्षांपासून बॉलिवूड आणि भारतापासून दूर असलेली ममता अचानक भारतात परतली आणि महाकुंभात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. यामुळे आता तिच्यावर सातत्याने टीका होत आहे. एका दिवसात कोणी संत होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी कुंभमेळ्यात रील्स बनवण्याच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अश्लिलतेबद्दल नाराजी व्यक्त केली. यासोबतच कोणीही एका दिवसात संत होऊ शकत नाही, यासाठी अनेक वर्षांची साधना करावी लागते, असेही म्हटले आहे. त्यांचा हा टोला अभिनेत्री ममता कुलकर्णीवर होता.
बाबा रामदेव म्हणतात, अचानक काहीजण महामंडलेश्वर झाले आहेत. नावापुढे 'बाबा' जोडल्याने कोणी लगेच साधू-संत होत नाही. रील्सच्या नावाखाली चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे योग्य नाही. खरे कुंभ ते आहे, जिथे मानवतेपासून देवत्व, ऋषीत्व आणि ब्रह्मत्वाकडे आरोहण होते. स्नान, ध्यान, योगाभ्यास, सत्य, प्रेम आणि करुणा, ध्यान योग, भक्ती योग, कर्मयोग, ही योगाची त्रिवेणी आहे. एक म्हणजे शाश्वत अनुभवणे, शाश्वत जगणे आणि शाश्वतचा विस्तार करणे. सनातनच्या नावाने फक्त काही ठराविक शब्द बोलणे म्हणजे सनातन नव्हे. सनातन हे शाश्वत सत्य आहे जे कधीही नाकारता येत नाही.
यावेळी त्यांना ममता कुलकर्णीबाबत विचारले असता बाबा रामदेव म्हणाले, कोणीही एका दिवसात संतपद प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे सराव करावा लागतो. आज स्वामी रामदेवही तुमच्यासमोर उभे आहेत. हे संतपद मिळवण्यासाठी आम्हाला 50-50 वर्षांची तपश्चर्या लागली. याला संतत्व म्हणतात. संत होणे ही मोठी गोष्ट आहे. महामंडलेश्वर हे फार मोठे पद आहे. आजकाल कुणालाही महामंडलेश्वर बनवले जात आहे, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले ?कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रभावाखाली येऊन कोणाला संत किंवा महामंडलेश्वर कसे बनवता येईल? अजून मीदेखील महामंडलेश्वर झालो नाही. यापूर्वी ट्रान्सजेंडर कथाकार जगतगुरु हिमांगी सखी यांनीही ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवण्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. एएनआयला दिलेल्या निवेदनात त्या म्हणाल्या की, किन्नर आखाड्याने हे केवळ प्रसिद्धीसाठी केले आहे. तिचा भूतकाळ समाजाला चांगलाच ठाऊक आहे. अचानक ती भारतात येते आणि महाकुंभला हजेरी लावते आणि तिला महामंडलेश्वर पद दिले जाते. याची चौकशी झाली पाहिजे.