नवी दिल्लीः राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत 125 खासदारांचं समीकरण जमवून भाजपाला धक्का देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आज फसला. विरोधकांच्या रणनितीला योग्य प्रत्त्युत्तर देण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी झाल्याचे आडच्या निकालामधून लक्षात आले. इतकेच नव्हे तर भाजपाच्या प्रयत्नांपेक्षा काँग्रेसच्याच काही चुकांमुळे जनता दल युनायटेडच्या उमेदवारास यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या पाच चुका टाळल्या असत्या तर राज्यसभेत आज वेगळे चित्र पाहायला मिळाले असते असे दिसत आहे.
1) उमेदवार निवडीसाठी उशीर-राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसने उमेदवाराची घोषणा करण्यासाठी फारच उशिर केला. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निवडणुकांची घोषणा झाल्यावर तात्काळ आपला उमेदवार जाहीर केला. विरोधीपक्षांमध्ये मात्र नामांकन पत्र भरण्याच्या दिवसापर्यंत चर्चा सुरु होती. विरोधी पक्षांमधून सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यांचे नाव निश्चितच झले आहे असे वातावरणही तयार करण्यात आले मात्र अगदी शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी बी. के. हरिप्रसाद यांचे नाव पुढे केले. त्यांचे नाव घोषित होईपर्यंत रालोआने आपल्या तयारीची आणखी काही पावले टाकली होती. तोपर्यंत त्यांना आपल्या मित्रपक्षांशी बोलण्यात व त्यांचे समर्थन मिळवण्यात यश आले होते. यासर्वप्रकारासाठी राहुल गांधी यांना जबाबदार धरले जात आहे.
2) निवडणूक संपुआची नाही तर काँग्रेसची झाली-उपाध्यक्षपदासाठी आपल्याच पक्षाचा उमेदवार लढवण्याच्या हट्टामुळे ही लढाई रालोआ विरुद्ध संपुआ असे होण्याऐवजी रालोआ विरुद्ध काँग्रेस झाली. त्यामुळेच आपल्या पक्षाच्या उमेदवाराला इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात काँग्रेसला अडचणी आल्या. तिकडे रालोआतर्फे जनतादल युनायटेडचे हरिवंश निवडणूक लढवत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि इतर रालोआ सदस्यपक्षांचे नेते पाठिंब्यासाठी एकत्रित प्रयत्न करत होते.
3) पाठिंबा मिळवण्यात प्रयत्न कमी पडले-उपाध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी रालोआचे नेते सतत सक्रीय राहिले. मात्र बी.के. हरिप्रसाद यांच्यासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात राहुल गांधी कोठेच नसल्याचे दिसले. त्यामुळे संख्याबळ जमवणे शक्य असूनही विरोधकांना पराभव पत्करावा लागला. अण्णाद्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती आणि बिजू जनता दलासारखे पक्ष विरोधीपक्षात असूनही त्यांनी जनता दल युनायटेडच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या तीन पक्षांचे मन वळवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करु शकले असते.
4) 'आम' आदमीचे 'खास' दुखणे-आम आदमी पार्टी, वायएसआर काँग्रेस आणि पीडीपी यांनी मतदानात सहभाग घेतला नाही. राहुल गांधी यांनी आपले नेते अरविंद केजरीवाल यांना पाठिंब्यासाठी फोनही केला नाही तर आम्ही मतदान तरी का करु असे मत आपचे खासदार संजय सिंह यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी पीडीपी किंवा वायएसआर काँग्रेस अशा पक्षांशी चर्चा केली असती तरीही आजचे चित्र वेगळे असते.
5) रालोआतील 'नाराज' दलांशीही चर्चा नाही-उपाध्यक्षपदासाठी रालोआतील एक प्रमुख घटकदल शिरोमणी अकाली दल आधीपासूनच प्रयत्नात होता. नरेश गुजराल यांना हे पद मिळेल अशी त्या पक्षाची अपेक्षा होती. मात्र जनता दल युनायटेडच्या उमेदवाराला ही संधी मिळाल्यामुळे अकाली दल व शिवसेना दोन्ही पक्ष नाराज झाले होते. मात्र त्यांचे मन वळवण्यात भाजपाला यश आले. या नाराज पक्षांशी चर्चा करुन त्यांना आपल्या बाजूने मतदान करण्याची विनंती काँग्रेसने संधी घालवली. बहुमत नसूनही सत्ताधारी आपला उमेदवार उपाध्यक्षपदावर निवडून आणण्यात यशस्वी झाले आणि बहूमत असूनही विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागला.