ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१० - एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचे देशपातळीवरील प्रवेश 'नीट' म्हणजे 'नॅशनल एलिजिबिलिटी अॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट'द्वारेच होतील असे सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केल्याने महाराष्ट्रासह देशातील वैद्यकशाखेला जाऊन इच्छीणा-या विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
> नीटची परीक्षा केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सीबीएसई बोर्डातर्फे घेतली जाणार आहे. नीटचा अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर आधारलेला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारतर्फे घेतल्या जाणा-या सीईटी परीक्षेची तयारी केली होती. हा अभ्यासक्रम राज्य परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रमावर आधारीत असतो.
> महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी गेली दोन वर्ष सीईटीची तयारी केली होती. ही परीक्षा पाच मे रोजी झाली. पण न्यायालयाच्या निर्णयामुळे या परीक्षेला आता काहीही अर्थ उरलेला नाही.
> त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नीट एकला बसलेल्या किंवा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती त्यांना नीट दोनला २४ जुलैला बसण्याची परवानगी दिली आहे. पण दोनवर्ष ज्या परीक्षेची तयारी केली त्या परीक्षेचा अभ्यास फक्त दोन महिन्यात कसा करायचा ? हे आव्हान आहे.
> विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा तयारी करण्याची वेळ मिळावा यासाठी नीट दोनचे वेळापत्रक बदलण्याची केंद्र सरकार, सीबीएसई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला मोकळीक आहे.
> दरम्यान नीट परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याची मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. विद्यार्थ्यांना तामिळ, तेलगू, मराठी, आसामी, बंगाली आणि गुजराती या सहा प्रादेशिक भाषांतून परीक्षा देता यावी, अशी विनंती सरकारने न्यायालयाकडे केली होती. मात्र, सीबीएसई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नीट परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याला विरोध दर्शवला आहे.
* कधी झाली सीईटीला सुरुवात?
राज्यात १९९७ मध्ये पहिली सीईटी झाली, त्यावेळी ५० टक्के बारावीचे गुण आणि ५० टक्के सीईटीचे गुण मिळून गुणवत्ता यादी प्रसिद्ध व्हायची. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अशा दोन्ही सीईटी एकत्र घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अशा दोन्ही सीईटी स्वतंत्र केल्या.