वादग्रस्त विधानांमुळे नेहमी वादात सापडणारे माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी शेतकरी आंदोलकांमध्ये जाऊन वादग्रस्त भाषण दिले आहे. योगराज यांनी हिंदूंवर वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. माजी क्रिकेटपटू युवराजचे वडील योगराज हे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते.
दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी जमा झाले आहेत. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ते करत आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या त्यांच्या राज्यात आंदोलन करत असलेले शेतकरी आता दिल्लीमध्ये संसदेला घेरण्य़ाच्या प्रयत्नात असून ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने दिल्लीच्या सीमेवर मोठा फौजफाटा तैनात करून या शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा, अश्रूधूर, बॅरिकेड्स लावत रोखले आहे. आज केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी होणार आहे. यातच शेतकऱ्यांनी आज ही आरपारची लढाई असेल असा इशारा सरकारला देत केवळ कृषी कायदे रद्द करण्यावरच चर्चा होईल असे सांगितले आहे. तसेच पुढील आठवड्यात आंदोलन आणखी तीव्र करून संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे.