भोपाळ- भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मध्य प्रदेशातल्या शाजापूरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस खोटी आश्वासनं देऊन मध्य प्रदेशमध्ये सत्ता हस्तगत करू पाहते आहे. आम्ही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवतो आहोत. परंतु काँग्रेसचा मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण आहे ?, या लोकांकडे राज्यासाठी कोणताही नेता तर नाहीच अन् साधी नीतीही नाही, असंही अमित शाह म्हणाले आहेत.शिवराज सरकारनं शेतकऱ्यांना जास्त कर्ज दिलं अन् कमी व्याज वसूल केलं. मध्य प्रदेशातील सर्व; गावांना रस्त्यांनी जोडण्याचं काम शिवराज सिंह चौहान सरकारनं केलं आहे. काँग्रेसच्या शासनकाळात धर्मांतरण आणि गोरखधंदाच सुरू होता, अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ते मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेतल्या रस्त्यांसारखे असल्याचे म्हणाले होते. अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत. मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यानंतर कारने जो प्रवास केला, त्यातून माझ्या हे लक्षात आले, असं ते म्हणाले होते. अमेरिकेतील एखाद्या रस्त्याच्या अनुभवातून तेथील सर्वच रस्त्यांविषयी सरसकट हे विधान त्यांनी केलं होते.एक खरं आहे की अमेरिकेतील अन्य राज्यांपेक्षा वॉशिंग्टनमधील रस्ते काहीसे वाईट आहेत. तेही सर्व नव्हे, तर काही भागांतील. तिथलं प्रशासनही ते मान्य करतं. ते का वाईट आहेत, याच्या मुळात जायचं कारण नाही. पण मध्य प्रदेशातील रस्ते देशातील अन्य राज्यांपेक्षा चांगले असले तरी ते अतिशय उत्तम आहेत, असं नाही. शिवाय मध्य प्रदेशातील काही रस्ते तर भलतेच खराब आहेत. त्यामुळेच शिवराज सिंह चौहान यांच्या या विधानावर सोशल मीडियावर टीका झाली. अनेकांनी तर त्यांची टिंगल करताना मध्य प्रदेशातील काही रस्त्यांचे फोटोही टाकले आहेत. एक रस्ता तर पाण्यात बुडाल्याने मुख्यमंत्र्यांना त्यांचे सुरक्षा कर्मचारी उचलून नेत आहेत, असाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.