ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताकडून जोरदार कूटनितीक प्रयत्न सुरु झाले आहेत. २००८ साली मुंबईवरील हल्ल्यानंतरही असेच प्रयत्न झाले होते. लष्करी पर्यायापेक्षा कूटनितीक पर्याय अधिक प्रभावी ठरेल असे काहीजणांचे मत आहे. पण त्यात अपेक्षेइतके यश मिळण्याची शक्यता कमी आहे. भारतावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अन्य देशांकडून तात्पुरता विरोध दर्शवला जातो पण नंतर सर्वकाही पूर्वीसारखे होते. मुंबई हल्ल्यानंतरही असेच झाले होते. पाकिस्तानला पूर्णपणे एकाकी पाडणे का शक्य नाही त्याची काही कारणे
- उरी दहशतवादी हल्ल्यानंतर काही देशांनी निषेधाचा संदेश प्रसिद्ध करताना स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केला. अमेरिकेने काश्मीर खो-यावरील हल्ला म्हटले आहे स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केलेला नाही. अमेरिकेप्रमाणेच काही महत्वाच्या देशांनी पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
- आज जगात अमेरिकेप्रमाणे चीनही एक महासत्ता आहे. चीनचा पाकिस्तानला भक्कम पाठिंबा आहे. त्यातुलनेत अमेरिकेचा आपल्याला तितका भक्कम पाठिंबा नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताकडून आणला जाणारा प्रस्ताव चीन आपल्या विशेषाधिकारा वापर करुन हाणून पाडतो. ही देखील भारताची एक मोठी अडचण आहे.
- अमेरिका अनेक वर्ष भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवत आला आहे. भारताची बाजू अमेरिका उचलून धरते. पण त्यावर कारवाई करायला पाकिस्तानला भाग पाडत नाही. याचे मुख्य कारण आहे पाकिस्तानचे भौगोलिक स्थान. आजही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे त्याचप्रमाणे अमेरिकेला असलेला दहशतवादाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा असला तरी, पाकिस्तानला दूर लोटून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पाकिस्तान विरोधातील दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिका पूर्णपणे भारताची साथ देणार नाही.
- पाकिस्तानला आज जगातील अनेक महत्वाच्या मुस्लिम देशांचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा तोडणे इतके सोपे नाही.