आसामची राजधानी गुवाहाटी सध्या जोरदार चर्चेत आली आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेली असताना दुसरीकडे आसामचे हजारो लोक पूरामुळे बेघर झालेले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार येथील पंचतारांकीत हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये शाही मेजवाणी झोडत आहेत. तर दुसरीकडे पूरग्रस्त लोकांना खायला अन्न नाही अशी अवस्था झाली आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आसामच्या पूरस्थितीचा हवाला देत शिवसेना आमदारांना तात्काळ आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना आमदार राहत असलेल्या हॉटेलचा खर्चच करोडोंमध्ये आहे. अशाप्रकारे पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा काही पैसा पूरग्रस्तांना देण्याची मागणी अनेकजण करू लागले आहेत.
या हॉटेलमध्ये १९६ खोल्या आहेत. परंतू शिवसेनेचे बंडखोर आमदार हे ७० खोल्यांमध्ये राहत आहेत. अशावेळी हॉटेल अन्य खोल्यांसाठी बुकिंगही घेत नाहीय. आधीपासून ज्यांची बुकिंग होती, तेच लोक तिथे राहत आहेत. याशिवाय बँक्वेटही बंद ठेवण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये ७ दिवसांसाठी भाडे ५६ लाख रुपये एवढे आहे. तर एवढ्या आमदारांना दिवसाला जवळपास आठ लाख रुपयांचे जेवण आणि अन्य सेवा लागत आहेत.
शिवसेना आमदारांसाठी हे हॉटेल सात दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. यावर जवळपास १.१२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.