Anurag Thakur Assembly Election 2023 : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. चार राज्यांत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले, तर तेलंगणात काँग्रेसने बहुमताने सत्तेत आली. या निकालानंतर EVM चा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आला. यावरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
काँग्रेसवर आरोप करताना अनुराग ठाकूर म्हणाले, 'यातून त्यांची विचारसरणी स्पष्टपणे दिसते. त्यांना देशाची संस्कृती आणि अस्मिता नष्ट करायची आहे. तुकडे तुकडे गँगसोबत काही लोक उभे आहेत, मात्र आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही. त्यांची विचारसरणी फक्त हिंदुत्व आणि सनातन धर्माचा अवमान करणारी आहे.'
तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, 'तेलंगणाच्या भावी मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी केले होते, ज्यात त्यांनी तेलंगणाचा डीएनए बिहारच्या डीएनएपेक्षा चांगला आहे, असे म्हटले होते. सनातन धर्म, हिंदू आणि हिंदी भाषिक लोकांविरुद्ध तर द्रमुक नेत्यांचे षड्यंत्र सर्वांनाच ज्ञात आहे.'
'दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक विरोधी नेते ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही. पराभवानंतर ते आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही, फक्त ईव्हीएमला दोष देतात. ते फक्त हिंदू आणि सनातन धर्माला लक्ष्य करतात. यातून त्यांची मानसिकता दिसून येते,' अशी टीका ठाकूर यांनी यावेळी केली.