जर आपल्यात फूट पडली नसती, तर ना श्री राम मंदिर पडले असते, ना श्रीकृष्णजन्मभूमीवर गुलामगिरीचा 'ढाचा' तयार झाला असता. ना देशाला गुलाम व्हावे लागले असते. यामुळे मजबूत सरकार असणे आवश्यक आहे. हरियाणात भाजपचे सरकार आल्यानंतर राममंदिर आणि कृष्णजन्मभूमीला विरोध करणारे रस्त्यावर हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे राम, हरे राम करताना दिसतील, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते हरियाणातील फरीदाबाद येथे विधानसभा प्रचारादरम्या बोलत होते.
योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाली.
गेल्या 10 वर्षांत डबल इंजिन सरकारने हरियाणाला विकास आणि सुशासनाचे मॉडेल दिले आहे. भारतीय जनता पक्ष असेल तर श्रद्धेचा आदर केला जातो, सुरक्षितता, रोजगार आणि गरीबांच्या कल्याणाची हमी असते, असेही योगी म्हणाले.
योगी म्हणाले, उत्तर प्रदेश हरियाणाला लागून आहे. सात वर्षांपूर्वी येथे काय परिस्थिती होती? रोज दंगल व्हायची. महिनाभर संचारबंदी चालायची. शेतकऱ्यांचे पीक तयार होत होते, पण कुणी दुसरेच त्याची कापणी करून घेऊन जात होते. मात्र, आपण बघितले असेल की, गेल्या सात वर्षांत तेथे एकही दंगल झाली नाही. डबल इंजिन सरकार जोरदार सुरू आहे. काँग्रेसने हरियाणात माफिया राजवट दिले आहे. माफिया राजवटीपासून मुक्ती हवी असेल तर भाजप हा एकमेव पर्याय आहे.